शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड

 

शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड 



त्या शाळेच्या गेटसमोर, पिवळ्या फुलांचं मोठ्ठ झाड आहे. शाळेची इमारत बांधून झाल्यावर उद्घाटनाच्या वेळी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणात, हे झाड लावलं होतं. इतक्या वर्षात किती छान वाढलंय. मजबूत खोड झालंय, फांद्याचा पसारा वाढलाय, त्याला छान पिवळी फुलं येऊ लागली. तशी त्याची पिवळी धमक फुलं कमी अधिक प्रमाणात वर्षभर दिसत असतात. रोज काही फुलं खाली रस्त्यावर, शाळेच्या गेट समोर पडतात. त्याच पिवळ्या फुलांवरून, शाळेच्या मुलांना घेऊन येणाऱ्या पिवळ्या बस गेटच्या आत येत असतात. शाळाही इतक्या दिवसांत छान वाढलीय. आधी फारच कमी मुलं होती. आता हजाराच्या वर मुलांची संख्या झालीय.

शाळेचं उद्घाटन झालं तेव्हा अजिबात झाडं नव्हती, म्हणून चांगली मोठी झाडं लावली होती. शाळेच्या इमारती एवढ्या उंचीची झाडे होती ती. शाळेचा प्रत्येक मजला जसा वाढत गेला, तशीच झाडानेही शाळेच्या उंचीची बरोबरी केली. एका कालावधी नंतर शाळेच्या इमारतीचे मजले चढायचे थांबले. झाड मात्र जमिनीच्या खाली आणि आकाशभर वाढतच राहिलं. खोड मजबूत झालं, फाद्यांचा पसारा वाढला. आता झाड शाळेच्या इमारतीपेक्षाही मोठं झालंय.

शाळेत जशी मुलांची शाळा भरते तशीच झाडही पानांची शाळा भरवत असते. मुलं जशी शाळेत कवळ्या वयात येतात, जग बघायला शिकतात, खेळतात, उड्या मारतात, उद्यासाठी स्वतःला तयार करतात. झाडही तसच करत असतं. झाडाची तांबूस रंगाची पालवी दिसते, ती पालवी वाढत जावून, पिवळसर बनत, पुढं गर्द हिरव्या रंगाची पाने, उद्यासाठी स्वतःला तयार करतात.  

शाळेतील पोरं रोज घरी जातात आणि दुसऱ्या दिवशी आवरून येतात. झाडाची शाळा मात्र निवासी शाळा आहे. आणि इथलं शिक्षणही दिवसरात्र अविरतपणे सुरु असलेलं आहे. तसं तर मुलंही दिवसरात्र अविरत शिकतच असतात. पण शाळा मात्र ठराविक साच्यातील अभ्यासक्रम शिकवून त्याचीच परीक्षा घेऊन निकाल देते. अभ्यासक्रमाबाहेरील आणि शाळेच्या साच्याव्यतिरिक्त शिकलेलं आणि आत्मसात केलेलं कसब, मुलांनी प्रत्यक्ष जगण्यात वापरून बघायचं असतं. त्याचं मूल्यमापन शाळा नाही, तर आयुष्य करत असतं.

मग घरी जशी आई पोरांना लवकर उठवते, अंघोळ घालते, खायला देते, डबा देते, अभ्यास झाला कि नाही ते चेक करते आणि वेळेत शाळेला पाठवते, तसच झाडही करतं. आईला जशी इतरांची मदत होते, तशीच मदत झाडालाही मिळते. म्हणजे वाऱ्याची चुळबुळ किवा पक्षांच्या आवाजाने पानांना जाग येते. पावसाचा हलकासा शिपकारा पानांना अंघोळ घालतो. झाडांची मुळं पानांना पाणी पुरवतात, बाकी रसद उपलब्ध करून देतात. आता वाऱ्याचा वेग जरा वाढतो, पानांची प्रार्थना संपून कवायत सुरु असते.

झाडाच्या शाळेत पानं शिकत असतात. पानं शिकतात देठाच्या मदतीने फांदीला कसं पक्क चिटकून रहायचं. किडा अळी व रोगराईपासून स्वतःला कसं वाचवायचं? मुळांनी पुरवलेली रसद वापरून, सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न कसं तयार करायचं? पानं शिकलेलं कसब छान आत्मसात करतात. ते उपयोगातही आणतात. आपलं काम चोख बजावतात. झाडाच्या शाळेत, पानांच्या जगण्याचं ध्येय हे आधीपासूनच ठरलेलं असतं. पानं तेच शिकतात. पानं आनंदी दिसतात.

मुलांच्या शाळेत जरा वेगळं आहे. इथं मुलांना एकाच वेळी बऱ्याच विषयांची ओळख आणि अभ्यास दिला जातो. त्यात उपयोगात आणण्याजोगे कसब आत्मसात करण्याऐवजी परीक्षेत मार्क किती मिळवले यावर मूल्यमापन ठरतं. त्यामुळे आयुष्यात तगून राहण्यासाठीचा संघर्ष हा वेगळा करावा लागतो.

मुलांच्या शाळेत, मुलं त्यांच्या मातीला घट्ट पकडून राहायला शिकत नाहीत. आपण जे खातो ते येतं कुठून याविषयी जागरूक दिसत नाहीत. आपल्यासाठी अहोरात्र झटत असणाऱ्या इकोसिस्टीमला गृहीत धरतात. मुलांच्या मुळांवर संस्कार होण्याऐवजी त्यांच्या फाद्यांना चमकवले जाते. ती चकाकी म्हणजे प्रगती हे मूल्यमापन मुलांच्या शाळेत होत असते.

शाळेच्या गेटवरील झाड हे सर्व नेहमी बघत असते. मी पानांना काहीतरी शिकवतोय, त्यांची शाळा भरवतोय हे झाडाच्या गावीही नसते. अतिशय सहज आणि नैसर्गिकपणे, पान हे झाडाचा अविभाज्य घटक बनून राहते. या परिसरातील शाळा मात्र तिथं सहज वाटत नाही. शाळेच्या आजुबाजूचे वातावरण शाळेत दिसत नाही. परिसरातील प्रश्न यावर मुलांना विचार करायला सांगितले जात नाही. मुलांच्या अभ्यासक्रमातील गोष्टींमधल्या पर्शिअन गोष्टी त्यांच्या गावच्या असत नाहीत. मुलं परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे देवून मार्क मिळवायचे म्हणून पर्शिअन गोष्ट पाठ करतात. त्या गोष्टीत रस्त्यावर भेटणारी पात्र, मुलांना पिवळ्या बस मधून जाता येता रस्त्यावर दिसत नाहीत.

शाळेला झाड आणि झाडाला शाळा कळत नाही. शाळा इमारत आहे. झाड जिवंत आहे. झाडाला मुलांचा खुशीत असतानाचा गलका जसा ऐकू येतो. तशीच शाळेविषयीची मूक अल्ट्रासोनिक धास्ती सुद्धा सहज ऐकू येते. मुलांचा गलका शाळेतील शिक्षक शिस्तीने बंद करतात. शाळेची मूक अल्ट्रासोनिक धास्ती त्यांनाही ऐकू येत नाही.

पालकांना, मुलांसाठी ते सर्व करायचं आहे, जे झाड आपल्या पानांसाठी करतं. शाळेलाही ते सर्व करायचं आहे जे झाड आपल्या पानांसाठी करतं. शाळा सुविधा देते, पालक फी देतात, मुलं आपल्या जगण्यातील वेळ देतात. पण तरीसुद्धा शाळा, मुलं आणि पालक ...झाड का बनत नाही?

मनोज हाडवळे

शेतीमाती

९९७०५१५४३८     

Comments

Popular posts from this blog

बुक फेस्टिवल पुणेः २०२५

आपण सगळेच कलाकार