बुक फेस्टिवल पुणेः २०२५

 


अनेक प्रवास...अनेक वेदना...अनेक आनंद...अनेक दृष्टिकोन...अनेक अनुभव...अनेक गोष्टी...अनेक प्रवास... इथं जमा झालेत. 


जगाच्या कानाकोपऱ्यातील लेखकांनी, शब्दबद्ध केलेल्या  त्यांच्या गोष्टी, नटून थटून जमा झाल्यात.


नुसत्या जमा नाही झाल्यात तर त्याही मोठ्या उत्साहाने सजून सहभागी झाल्यात, अनेक रंग...अनेक लिपी...अनेक भाषा...अनेक आकार...अनेक बांधणी आणि अनेक फील घेऊन.


नव्या कोऱ्या पानांचा ताजा सुगंध...ताज्या बायडिंगचा नवाकोरा स्पर्श...स्वतःला नीटनेटकं प्रेजेंटेबल बनवत, उभी राहिलेली पुस्तकांची आरास, पुणे बुक फेस्टिवल -२०२५ ला अजून सुशोभित करतेय.


इथं पुस्तकांच्या गाठीभेटी होतात, भाषांची एकत्र ऊठबस होते. प्रकाशकांच्या पालकत्वाने आणि वितरकांच्या बोलाचालीत पुस्तकांच्या, वाचकांसोबत  सोयरिकी घडताना दिसतात.


फायनल बिल करून, पुस्तकं पिशवीत भरून देताना; मुलीची बोळवण केल्यासारखं, दिल्या घरी सुखी रहा म्हणत प्रकाशक/वितरक; पुस्तकं, वाचकांच्या हाती सोपवत असतात.


वाचक, त्या पुस्तकाला, आधीच गर्दी असलेल्या आयुष्यात थोडी जागा करून देतो आणि पुढे चालू लागतो.


..आणि पुस्तक? इतका वेळ टेबलवर/रॅकमधे इतर पुस्तकांसोबत गप्पा मारत, येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीला न्याहाळत असताना; अचानक हाताला लागून, पिशवीत जाऊन स्थिरावतं.


पुस्तकाला प्राक्तन माहीत नसतं अशातला भाग नाही. आपण, लेखकाची गोष्ट वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहोत, आपण इथं रॅकमधे पडून राहायला जन्माला नाही आलो, हे त्यालाही माहीत असतं.


पण सहवासाने, इतर पुस्तकांसोबत थोडी जवळीक वाढते म्हणून, जरा वेळचं मौन...आणि पिशवीतील इतर नव्या पुस्तकांसोबतचा सहवास सुरू.


..इकडं रॅक मधील रिकाम्या जागेत नवं पुस्तक येऊन पडतं, स्वतःला ऍडजस्ट करत, आपली जागा सेट करतं. बाकीची पुस्तकही त्याला आपल्यात सामावून घेतात.


पुस्तकं सुद्धा जागा बदलत जातात, कारण मागच्या क्षणाला दुसऱ्या कोणी आपल्याला स्पर्श केलेला असतो, तो वाचक पुढल्या स्टॉल वर सरकलेला असतो. आणि पुढच्याच क्षणाला नव्या वाचकाने; पुस्तक हातात घेऊन, मागच्या बाजूला लिहिलेलं वाचायला सुरुवात केलेली असते.


दरवर्षी नवी माणसं..नवे वाचक...नवी पुस्तकं आणि नवे प्रकाशक...हा गोतावळा वाढतच चाललाय. जागा मात्र तीच आहे, दरवेळी नव्या उत्सवाच्या तयारीत, उत्साहाचा सडा टाकत; आणि आधीच्या उत्सवाच्या आठवणींचे निर्माल्य उचलत.


...पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून, ८०० स्टॉल वरील पुस्तकं, प्रकाशक, वितरक, आयोजक आणि वाचक या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेने चार्ज झालेलं वातावरण, सगळ्यांनाच वाचनासाठी प्रोत्साहित करेल. वाचकांनी पुस्तकांची खरेदी तर दणक्यात केलीय. आधीची खूप सारी पुस्तकं वाचायची तशीच राहून गेली असली तरीही  नव्याने पिशवी भरलीय. 


कमी झालेलं किंवा अगदीच बंद झालेलं वाचन पुन्हा सुरू करणार असा मनोमन निर्धार करताना, खिशातला मोबाईल मात्र उगाच गालात हसतो.


मनोज हाडवळे

पराशर कृषी व संस्कृती पर्यटन 

9970515438

Comments

Popular posts from this blog

शाळेच्या गेटसमोरील पिवळ्या फुलांचे झाड

आपण सगळेच कलाकार