भारत -एक खोज
भारत- एक खोज
त्यादिवशीच्या संध्याकाळी मी पराशर वर काम करत असताना मला वॉट्स अप वर एक मेसेज आला, कर्नाटक मधील मणीपाल विद्यापीठाचा आर्किटेक च्या शेवटच्या वर्षाचा हा विद्यार्थी आपल्या पराशर चा अभ्यास करायला येऊ इच्छित होता. इतर चौकशी करून झाल्यावर 2 दिवसासाठी येण्याचे ठरले आणि तो परवा येऊनही गेला.
बेंजामिन ओमेन, वय असेल 21-22 वर्ष, तसा तो केरळचा पण शिकायला कर्नाटकला गेला, त्याचे आईवडील दुबईला असतात, वडील एका मल्टीनेशनल कंपनीत सिनिअर हेड आहेत तर आई शिक्षिका.
इकडे गावी चुलते काका असतात. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे
त्याची विचारप्रक्रिया आणि कामाची पद्धत. बेन्जामिनला रेखाटनाची आवड म्हणून तर
भाऊने येतानाच्या प्रवासातील त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाचे, बस मधील कंडक्टरचे स्केच काढले होते. त्याच्या वयाची किंवा
त्याच्या सोबतची पोरं कुठं तरी मजामस्ती करण्यात गुंग असताना, हा त्याच्या
आवडीच्या गोष्टीचा अभ्यास करायला इतक्या लांब आला होता, याचेच मला जास्त कौतुक
वाटत होते.
त्याने,
त्याच्या प्रकल्पासाठी कृषी पर्यटन हा विषय निवडला आहे, मग अभ्यास दौऱ्यासाठी इतर खूप सारी चांगली कृषी पर्यटन केंद्रे
असताना, त्याने पराशरच का निवडले याची उत्सुकता मला पण होतीच. या विषयावर छेडले
असता म्हणाला, मी गुगलवर बरेच शोधले पण ज्याला कृषी पर्यटन म्हणता येईल असे
काही सापडेना. शिवाय पराशरचे नाव पुन्हा पुन्हा समोर येत होते, म्हणून वेबसाईट वर
गेलो तर पाहता क्षणीच ठरवले कि इथेच जायचे.
मला आनंद तर
झालाच पण त्याच वेळी जबाबदारी वाढल्यासारखे जाणवले, दुपारचे जेवण झाल्यावर तो बाहेर बसून काहीबाही रेखाटत होता, आराम कर मग संध्याकाळी बोलू निवांत; कारण रात्रभर प्रवास झाला
होता, छान झोप झाल्यावर संध्याकाळच्या चहासोबत गप्पा सुरु झाल्या, आर्किटेक का व्हायचंय? ज्या तरुण पिढीचे तो प्रतिनिधित्व करतो यावर त्याचे मत काय? तो पण परदेशात जाणार कि इथेच काही करणार? अशा बऱ्याच प्रश्नांवर तो अगदी स्पष्टपणे बोलला, त्याची व्हिजन क्लिअर होती, त्याच्या गावी केरळला एकरभर जागा आहे, डोंगराच्या पोटाला, त्याला तिथे जाऊन रहायचंय आणि तिथून काम करायचंय. वा, क्या बात है.
मला शरद मांडे
काकांनी नितीन चंद्रकांत देसाई यांचे पुस्तक दिले होते ते त्याला दाखवले, त्यातली स्केचेस पाहून स्वारी एकदम खुश झाली. मग बराच वेळ ते
पुस्तक चाळत बसला. त्याला स्केचिंगची आवड आहे म्हटल्यावर वेळ मिळेल तसा पराशरच्या
कोपऱ्या कोपऱ्याला बसून कागदावर रेखाटत बसला. मावळतीला त्याला घरी घेऊन गेलो, जरा नवीन एक्सपोजर म्हणून, महाराष्ट्रातील घरे कळावीत म्हणुन दुसऱ्या दिवशी गाव दाखवला. दोघांनी मिळून मिसळ हाणली.
बेंजामिन आणि
त्याचे मित्र स्वतः जेवण बनवायचे, शॉर्टकट म्हणून फिश राईस अंडा राईस असं काहीतरी करून खायचे, मला माझे कॉलेज मधील दिवस आठवले. आम्ही पण एक सेमेस्टर असा
प्रयोग केला होता, मी भाजी बनवायचो आणि पोळ्या भाजायचो, खूप प्रयोग व्हायचे, आम्ही तिघे भाजी खरेदीला जायचो तेव्हा त्या भाजीला शास्त्रीय
नावाने संबोधित करत असे. जसं कि बटाटा न म्हणता, सोल्यानम ट्यूबरोजम म्हणायचो. त्याने
आमचा अभ्यास व्हायचा, पण भाजीवाले आम्हाला भाजी द्यायचे बंद करायला लागले म्हणुन
आम्हीच स्वतः जेवण बनविणे बंद केले.
आमच्या
तिघांपैकी एक जण ठाण्यात वित्तलेखा अधिकारी आहे तर एक सांगलीला कृषी अधिकारी (मग, माझ्या हातच्या भाजीला कसच तसा होता). असो यावर पुन्हा कधीतरी.
मी खूप दिवसातून अशा प्रकारचे चविष्ट शाकाहारी जेवण खात आहे, म्हणत पोर मनसोक्त
आस्वाद घेत होते आणि मला माझीच भुक भागल्यासारखे वाटत होते. दुसऱ्या दिवशी लवकर
जायचे म्हणून आवराअवर झाली, त्याला वाचनाचीही आवड होती म्हणून नम्रताने बनविलेल्या बुकमार्क
मधून, त्याला एक भेट दिले.
मी पुन्हा नक्की
येईल म्हणत, त्याने कालपासून पराशरचे काढलेले स्केचेस दाखवले, रेखाटनातले पराशर तर खऱ्या पराशरपेक्षाही सुंदर वाटत होते.
त्याला आळेफाटा येथे सोडवायला गेलो तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना माझा मोठा भाऊ मला
सोडवायला यायचा त्याची आठवण झाली, कामातून जोडले जाणारे हे प्रेमाचे ऋणानुबंध गोतावळा वाढवत चालले
आहेत.
मनोज हाडवळे

Comments
Post a Comment